बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव तथा युवा नेते जय पवार यांनी आज बारामतीत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जयदादा, आपल्याला अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यासाठी आता तुम्ही अॅक्टिव्ह व्हा अशी गळ घातली. त्यावर जय पवार यांनी सकारात्मक उत्तर देत कार्यकर्त्यांच्या आग्रहाबद्दल विचार करण्याचे संकेत दिले.
युवा नेते जय पवार यांनी आज बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाला भेट दिली. बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, युवक तालुकाध्यक्ष राहुल वाबळे, महिलाध्यक्षा अनीता गायकवाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल कावळे, शहराध्यक्ष तुषार लोखंडे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी जय पवार यांचे स्वागत केले. यावेळी जय पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
अजितदादांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य झाला. कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे आपण आज खास या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आल्याचं जय पवार यांनी यावेळी सांगितलं. आपल्याला कार्यक्रमाला येता आलं नाही. मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहिल्याचं सांगत अजितदादांच्या नागरी सत्कारासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी जय पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांची आपुलकीने विचारपूसही केली. या दरम्यान, कार्यकर्त्यांनी अजितदादांना आता मुख्यमंत्री बनवायचे आहे. त्यामुळे जयदादा, तुम्ही अॅक्टिव्ह व्हावं असा आग्रह धरला. त्यावर जय पवार यांनी तुम्ही दादांना सांगा, दादांकडून ग्रीन सिग्नल मिळाला की मी कामाला लागेन असं उत्तर दिलं.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी जय पवार यांना राजकारणात येण्यासाठी आग्रह धरला असून त्यासाठी अजितदादांना गळ घालण्याची तयारी केली आहे. जय पवार यांनी पार्थ पवार यांच्याप्रमाणेच राजकारणात सक्रिय व्हावं अशी आग्रही मागणी कार्यकर्ते करताना दिसतात. त्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.