पुणे : प्रतिनिधी
भाजपने मिशन बारामती सुरू केलेलं असतानाच अनेक नेत्यांचे दौरे बारामतीत होत आहेत. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खोचक सवाल उपस्थित केला आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचं सोडून बारामती दौरे करत आहेत. बारामतीला धडका मारून काय होणार आहे का असा सवाल उपस्थित करत मागीलवेळी बारामतीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराचं डिपॉझिटच जप्त झालं होतं असा टोलाही अजितदादांनी लगावला आहे.
लोणीकंद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. आम्ही शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यायचा निर्णय घेतला. मात्र केंद्र सरकारने त्यासाठीचे २ टक्के व्याज द्यायचं बंद केलं. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज का मिळू नये..? याचं उत्तर केंद्र सरकारमधील मंत्री देत नाहीत. सगळं सोडलं आणि बारामतीला गेलेत. बारामती धडका मारून काही होणार आहे का..? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
मागील काही दिवसांपासून भाजपच्या मिशन बारामतीची चर्चा सुरू आहे. त्यातच मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामतीत आणि बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुरंदरमध्ये दौरा झाला. आगामी काही दिवसांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याही बारामती लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला. बारामतीत धडका मारून काही होणार आहे का असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याचीही आठवण करून दिली. एकूणच येणाऱ्या काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा जोरदार संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे संकेतच या निमित्ताने मिळत आहेत.