
पुणे : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नव्हते. तसेच राज्यातील घडामोडींवरही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे अजितदादा नाराज आहेत अशा बातम्या माध्यमातून आल्या.त्यावरून अजितदादांनी जोरदार फटकेबाजी करत खास शैलीत माध्यमांना कानपिचक्या दिल्या आहेत. प्रत्येकाला व्यक्तीगत आयुष्य आहे, त्यातून ती व्यक्ती परदेशी गेली तर माध्यमांनी नाहक बदनामी करणं योग्य नाही असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डीत झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार हे परदेशात गेले होते. काल रात्री ते परतल्यानंतर आज त्यांनी मावळमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. या दरम्यान त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत माध्यमांमधून आलेल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत नाराजीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर टीकाही केली.
मी नाराज असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मी काही दिवस आजारी होतो. मला खोकला लागला होता. त्यामुळे मी लोकांसमोर आलो नाही असे सांगतानाच सहा महिन्यांपूर्वी माझा परदेश दौरा ठरला होता. त्यामुळे मी ४ नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजता विमानाने गेलो. काल रात्री उशिरा भारतात परत आलो. पण इथे माझ्याबद्दलच्या काहीही बातम्या चालवल्या आणि गैरसमज निर्माण केला गेल्याचे अजितदादांनी सांगितले.
माझ्याबाबत अशा काही बातम्या इकडे उठवण्यात आल्या. दादा इकडे गेले, दादा तिकडे गेले. दादा नाराज आहेत, दादा अमकं आहेत. काय दादा वाचून कुणाचं नडतं कुणाला माहित अशा शब्दांत त्यांनी माध्यमांसह अफवा पसरवणाऱ्यांवर शरसंधान साधले. मला काही व्यक्तिगत आयुष्य आहे की नाही असा सवाल करत कारण नसताना बदनामी करायची, लोकांच्यात गैरसमज निर्माण करायचे हे बरोबर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मी गेले काही दिवस परदेशात होतो. मात्र काहीही माहिती घेतली जात नाही आणि बातम्या चालवल्या जातात. कुणीतरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधून मी कुठे आहे याची माहिती घ्यायला हवी होती. आता यावर मी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन बोलणार आहे. मात्र मागच्या काही दिवसांत माझी बदनामी करण्यात आली. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मी कधीही पळून जाणारा नाही, कोणत्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.