मुंबई : प्रतिनिधी
मशिदींवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, आज राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वसंत मोरे यांना निमंत्रण नव्हते. त्यातच त्यांची शहराध्यक्षपदावरून गच्छंती करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यादिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्षेप घेत राज्य सरकारने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी मशिदींसमोर मोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवू अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यावर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आज राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसेच्या पुणे शहाराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, वसंत मोरे यांना आजच्या बैठकीचे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. त्यातच त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांची भूमिका नेमकी काय असेल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.