मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये युतीबाबत आज चर्चा झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून शिवसेनेसोबत युती करण्यास होकार देण्यात आला होता. परंतु वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होणार की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती होणार याबाबत स्पष्टता देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचे का ? याबाबत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. बैठकीसाठी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याविषयी चर्चा होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.