आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन येत्या शुक्रवारी बारामतीत; असा असेल दौरा..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

भाजपच्या मिशन ४५ अंतर्गत येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्यावर देण्यात आली आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. २३ सप्टेंबर रोजी त्या बारामतीत येणार आहेत. अधिकाऱ्यांसोबत बैठक, भाजप कार्यालयाला भेट आणि सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद असा त्यांचा बारामतीतील कार्यक्रम असणार आहे. २२, २३ आणि २४ सप्टेंबर या तीन दिवसांत त्या बारामती लोकसभा मतदारसंघात असतील.

भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची या मतदारसंघासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात त्या वेळोवेळी बारामती मतदारसंघाला भेट देऊन विकासकामांसह संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी खडकवासला विधानसभा मतदारसंघात निर्मला सितारमन यांचा दौरा असणार आहे. सकाळी ८.३० वाजता त्या वारजे येथील अविस्मरण हॉल येथे लोकसभा कोअर समितीची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी १० वाजता धायरी येथील मुक्ताई गार्डन येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दुपारी १२ वाजता धनकवडी येथे विचार परिवार समन्वयक बैठक आणि जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. दुपारी १.३० वाजता बावधन येथे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल.

दुपारी ४ वाजता भोर विधानसभा मतदारसंघातील वरवे बुद्रुक येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ७ वाजता पुरंदर विधानसभा मतदारसंघातील भिवडी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजर राहतील. ७.४५ वाजता सासवड येथे घरोघरी जाऊन जनसंपर्क कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता जेजूरीच्या खंडेरायांचे दर्शन घेऊन विश्वस्तांशी संवाद साधतील. १० वाजता जेजूरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. दुपारी १२ वाजता बारामती विधानसभा मतदारसंघातील मोरगाव येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक होणार आहे. तर दुपारी १ वाजता बारामती येथील भाजप कार्यालयाला भेट देतील.

त्यानंतर दुपारी ३.३० वाजता मुक्ताई लॉन्स येथे सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता इंदापूर विधानसभा मतदारसंघातील जंक्शन, अंथुर्णे आणि निमगाव केतकी या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधतील. रात्री ८ वाजता झगडेवाडी येथे  दुर्बल घटकातील प्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे.

शनिवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता इंदापुरमध्ये युवक व नवमतदारांशी संवाद कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११ वाजता दौंड विधानसभा मतदारसंघातील खडकी येथे आयटी, सोशल मिडिया आणि युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. दुपारी १२.२० वाजता पाटस येथे शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची पाहणी केली जाईल.

दुपारी १ वाजता बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिरात मतदारांशी संवाद साधतील.  दुपारी २.१५ वाजता राहू येथे महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पुण्याकडे रवाना होतील. सायंकाळी ५ वाजता पुण्यातील कौन्सिल हॉल येथे केंद्राच्या योजना आणि विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता पत्रकारी परिषद घेऊन त्या आपल्या दौऱ्याची सांगता करतील.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us