मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि राष्ट्रीय युवती अध्यक्षा सोनिया दुहान यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांचा उद्या सोमवार दि. २७ मे रोजी अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच राष्ट्रीय युवती अध्यक्षा सोनिया दुहान याही शरद पवार यांच्यापासून फारकत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. धीरज शर्मा यांनी सोशल मिडियामध्ये पोस्ट करत आपण पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांची भेट घेतली. त्यामुळे ते अजितदादांसोबत जातील अशा चर्चा होत आहेत.
दुसरीकडे धीराज शर्मा यांच्या पाठोपाठ शरद पवार गटातील राष्ट्रीय युवती अध्यक्षा सोनिया दुहान याही अजितदादांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोमवार दि. २७ मे रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीत हे दोन्ही नेते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजते. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे दोघेही शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या या दोघांनीही शरद पवार यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे उद्याच या दोघांचा अजितदादांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय घडामोडी लक्षवेधक ठरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.