मुंबई : प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित यूसुफ लकडवाला याच्याशी खासदार नवनीत राणा यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. आता या व्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्यापुढील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे राजद्रोहाच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत. या दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत खासदार नवनीत राणा यांचे दाऊद इब्राहीमशी संबंधित यूसुफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी त्यांच्यावर ईडीने कारवाई का केली नाही असाही सवाल उपस्थित केला होता.
नवनीत राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तीकडून कर्ज घेतले असल्याने हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरतो. त्यामुळेच या प्रकरणात चौकशी झाली आहे का, याचे उत्तर ईडीने द्यायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे यूसुफ लकडावाला याला ईडीकडून मनी लॉन्डरींग प्रकरणात अटक केली होती. त्यातच त्याचा कोठडीत असताना मृत्यू झाला होता.
त्यानंतर आता या व्यवहारांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे राजद्रोहाच्या आरोपात पोलिस कोठडीत असतानाच आता आर्थिक गुन्हे शाखेकडूनही चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या विषयावरून पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.