मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेवर बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष्या सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आज दुपारीच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तत्पूर्वी काल रात्री उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत वर्णी लागणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बारामतीसह पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.