मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया दुहान या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडणार आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत आपण लवकरच पक्ष सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्याचवेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळेच अनेकांवर पक्ष सोडण्याची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे या कधीच आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
काल शरद पवार गटातील राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. युवती अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या सोनिया दुहान याही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती. त्यावर आज सोनिया दुहान यांनी माध्यमांशी संवाद साधत आपण पक्ष किंवा शरद पवार यांची साथ सोडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांच्यामुळेच अनेकांवर पक्ष सोडण्याची वेळ आल्याचा गंभीर आरोप सोनिया दुहान यांनी केला आहे.
शरद पवार यांना आम्ही नेहमीच दैवत मानले आहे. त्यातून आम्ही स्वत:च्या जीवाची पर्वा न करता काम करत राहिलो. मात्र पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा असलेल्या सुप्रिया सुळे या कधीच आमच्या नेत्या होऊ शकल्या नाहीत, असेही सोनिया दुहान यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडून आम्हाला निवडणुकीत काम करण्यासाठी अडवणूक करण्यात आली. तसेच विविध प्रश्नांबाबत शरद पवार यांच्याकडे म्हणणे मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळे यांनी फोन करून जाहीर वाच्यता करता येणार नाही अशी भाषा वापरली असाही आरोप त्यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांच्या आसपासच्या लोकांमुळे, निर्णय घेणाऱ्यांमुळे २०-२५ वर्षापासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना पक्षातून जाण्यास भाग पाडले जात आहे. पक्ष सोडायचाच असता तर आम्ही निवडणुकीतच निर्णय घेतला असता, असेही सोनिया दुहान यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे या स्वत:चं नेतृत्व सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आता लोक आपल्याला सोडून का जात आहेत याचा विचार करावा असेही सोनिया दुहान यांनी म्हटले आहे.