Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : दसरा मेळाव्यावरून शिंदे गट व शिवसेनेत वाद; शिवसैनिकांनी घेतली आक्रमक भूमिका

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

दसरा मेळाव्यावरून शिवसेना व शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवाजी पार्क कोणाला मिळाणार याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. परंतु तरीही ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर शिवाजी पार्क आम्हालाच द्यावा लागेल, असा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तोडून आणि घुसून सभा घेता येत नाही. शिवाजी पार्कवर कोणीही घुसखोरी करुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहेत’ असा अप्रत्यक्ष इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  या बैठकीत त्यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात  नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version