नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय नेते एस. आर. कोहली यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत जोरदार शक्तीप्रदर्शनही केले. त्यानंतर आज दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली.
या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या निलंबनाचा ठराव करण्यात आला. तसेच शरद पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असून पक्षाबाबत तेच निर्णय घेऊ शकतात असाही ठराव करण्यात आला आहे. एकीकडे अजितदादांच्या बाजूने सर्वाधिक आमदारांची संख्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच शरद पवार यांच्याकडून पलटवार करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं निलंबन करण्यात आलं. त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटाकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.