मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसात महाविकास आघाडीत बिघाडीच्या चर्चा होत आहेत. अशातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्येही तब्बल सव्वातास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणे लढण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरुन थेट सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्या ठिकाणी दोघांमध्ये तब्बल सव्वातास विविध विषयांवर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोघेही उपस्थित होते.
अदानी प्रकरण, नरेंद्र मोदी शिक्षण, ईव्हिएम अशा अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. राज्य आणि केंद्रातील विविध विषयांवर भुमिका मांडताना तिन्ही पक्षांनी समन्वय साधण्याबाबतही चर्चा करण्यात आली. संविधान विरोधी विषयांवर महाविकास आघाडीने ठामपणे संघर्ष करण्याची भुमिका यावेळी निश्चित करण्यात आली.