
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रात्री उशीरा ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय चाचणीनंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयात दाखल झाल्यानंतर आपल्याला संपवण्याचा डाव असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आपण या लढ्यात हरणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १६ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज सकाळी संजय राऊत यांना ईडी कार्यालयातून जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर ईडी न्यायालयात राऊत यांना हजर करण्यात आले.
दरम्यान, संजय राऊत यांनी वैद्यकीय तपासणीनंतर बाहेर पडताना कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं. या दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे, संजय राऊत यांना न्यायालयात आणल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आपल्याला संपवण्याचा हा डाव असल्याचं म्हटलं आहे. आपण या कारवाईला सामोरे जाणार असून कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसून या लढ्यात आपण हरणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.