ठाणे : प्रतिनिधी
तीन दिवसांत सलग दोन गुन्हे दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सोमवारी दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात आव्हाड यांना जामीन मिळाला आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर केला.
ठाण्यातील वाय जंक्शन येथे रविवारी एमएमआरडीच्या माध्यमातून उभारलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. या दरम्यान, एकनाथ शिंदे हे त्यांच्या वाहनातून जात असताना भाजपच्या रिदा रशीद या त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी आव्हाड यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला करत ढकलून दिल्याची तक्रार रिदा रशीद यांनी दिली होती. या तक्रारीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आज आव्हाड यांच्या अटकपूर्व जामीनावर ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये आव्हाड यांच्या वतीने वकील गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली. या घटनेबाबतच्या सर्व क्लिप न्यायालयात सादर करण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी छटपूजेच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित महिलेला बहीण म्हणून संबोधल्याचा एक व्हिडिओ न्यायालयात सादर केला.