Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : भाजपकडून राज्यसभेचे उमेदवार जाहीर; अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना संधी, शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये कालच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, नांदेडचे अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव मात्र या यादीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून आज महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये काल भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना संधी मिळाली आहे. तर माजी आमदार मेधा कुलकर्णी, नांदेड येथील अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांची नावे अनपेक्षितपणे आली आहेत.

या यादीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश असेल अशी शक्यता होती. मात्र त्यांचं नाव आलेलं नाही. त्यामुळे त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील अशा मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र भाजपकडून ऐनवेळी अनपेक्षित नावे पुढे आली आहेत.

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी

शिवसेनेकडूनही राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कॉँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. महायुतीच्या चार उमेदवारांची आतापर्यंत घोषणा झाली आहे. आता राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version