नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करू असे सांगतानाच जर सेना भाजपसोबत गेलीच तर आम्ही विरोधात बसण्याच्या तयारीत असल्याचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर दिल्लीत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. या राजकीय पेचावर तोडगा निघेल असा विश्वास असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात शिवसेनेची भूमिका पाहणे महत्वाचे आहे. त्यानुसार आमचीही भूमिका स्पष्ट केली जाईल.
यापूर्वीही सरकार उलथवण्याचे प्रयत्न झाले आहेत. गेल्या अडीच वर्षात अनेकदा सरकार पडेल असे सांगण्यात आले. आज निर्माण झालेला पेचही सुटेल आणि त्यातून सरकार पुन्हा सुरळीत चालेल असेही पवार यांनी नमूद केले. दुसरीकडे शिवसेना भाजपसोबत गेल्यास राष्ट्रवादी विरोधात बसेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.