
पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात आज अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काल रात्री पुण्यात दाखल झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सकाळी जे. डबल्यू. मेरीएट हॉटेलमध्ये एक महत्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत स्पष्टता नसली तरी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर ही बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रात्री उशीरा अमित शाह हे पुण्यात दाखल झाले. आज सकाळी त्यांनी पुण्यातील जे.डब्ल्यू. मेरिएट हॉटेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक घेतली. तब्बल अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र ही बैठक कोणत्या विषयांवर झाली याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी स्वत:साठी अर्थ खाते मिळवले, तर सहकारी मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळवून दिली. त्यामुळे अजित पवार हेच आता मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. अशातच आज गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात अजित पवार यांच्यासह एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात आणखी काही घडामोडी घडतील का याकडेच लक्ष लागले आहे.