
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची भेट घेतली आहे. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हेही उपस्थित होते. या सर्वांनीच मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करत विश्रांतीचा सल्ला दिला. दरम्यान, या नेत्यांमध्ये आणखी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून नवाब मलिक हे तुरुंगात होते. त्यांना किडनीचा आजार उदभवल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन देण्यात आला आहे. जामीनानंतर नवाब मलिक हे घरीच विश्रांती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या भेटीला पोहोचले. त्यांनी नवाब मलिक यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत विश्रांतीचा सल्लाही दिला आहे.
दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज स्वत: अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी मलिक यांची भेट घेतली. नवाब मलिक यांना ईडीने अटक केली त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष एकसंघ होता. मात्र आता अजितदादांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जामिनावर सुटकेनंतर नवाब मलिक कोणाला पाठिंबा देतात याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.