मुंबई : प्रतिनिधी
उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे. अशातच अजितदादांसह सर्वच मंत्र्यांनी वाय. बी. सेंटर येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल एक तास शरद पवार व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. दरम्यान, पवारसाहेब आमचे दैवत आहेत. आम्ही सर्वजण त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. तसेच पक्ष एकसंघ राहावा अशीही इच्छा आम्ही व्यक्त केल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर अजितदादांसह सर्वच मंत्री व नेते थेट वाय. बी. चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. या ठिकाणी सर्वांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. तब्बल एक तास शरद पवार यांच्या दालनात या सर्व मंत्र्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू होती. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील हेही उपस्थित होते.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी या भेटीबद्दल माहिती दिली. आम्ही आज पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र आलो होतो. त्यानंतर कोणतीही वेळ न घेता आम्ही सर्वजण पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. आम्ही पक्ष एकसंघ राहावा यासाठी विचार करावा आणि त्याबद्दल मार्गदर्शन करावं अशी भूमिका पवारसाहेबांसमोर मांडली आहे. आमचे सर्व मुद्दे पवारसाहेबांनी ऐकून घेतले. आता उद्यापासून आमचे मंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली कामकाज सुरू करतील, असेही पटेल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अजितदादांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सर्वच मंत्र्यांसह अजितदादा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर आता पुढे काय राजकीय घडामोडी घडतात, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.