Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : नाव आणि चिन्हावरील निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिका दाखल करण्यात आली असून त्यामध्ये अनेक मुद्यांवर दुर्लक्ष केले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेऊन या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागलेले होते. अशातच ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने निर्णय लोकशाही मार्गाने जाहीर केला नाही. पक्षाचे बहुसंख्य सदस्य ठाकरे गटात असताना केवळ आमदार आणि खासदारांच्या संख्येवर हा निर्णय देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच २०१८ च्या पक्षाच्या घटनेचाही विचार हा निर्णय देताना केला गेला नाही असेही या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, या याचिकेवर उद्याच सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे गटाला दिलासा मिळणार का याकडेच लक्ष लागले आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version