Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : आता बास झालं.. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा आणि संघटनेत जबाबदारी द्या : अजितदादांनी का केली ‘ही’ मागणी..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते अजित पवार हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज मुंबईत झालेल्या मेळाव्यातही त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. त्याचवेळी आता मला विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करा अशी मागणी केली आहे. मला या पदावरून मुक्त करून संघटनेत कोणतेही पद द्या आणि मग बघा पक्ष कसा चालतो अशा शब्दांत अजितदादांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे.

आज मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त मेळावा पार पडला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचवेळी पक्ष संघटनेच्या कामाबद्दलही परखड मते व्यक्त केली. पक्षातील नेत्यांना कानपिचक्या देत त्यांनी आपण स्वबळावर सत्ता का आणू शकलो नाही याचं आत्मचिंतन केलं पाहिजे असंही मत व्यक्त केलं.

मी गेली वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करतो आहे. मुळात मला यात कोणताही रस नव्हता. मात्र वरिष्ठांच्या सुचनेनंतर आपण हे पद घेतलं. काहीजण म्हणतात मी कडक बोलत नाही. आता काय त्यांच्या कॉलर पकडायच्या का..? असा सवाल करत अजित पवार म्हणाले, आता बास झालं या पदावरून मुक्त करा. मला संघटनेत कोणतेही पद द्या आणि मग बघा पक्ष कसा चालतोय. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे आता तुम्ही कसलंही पद द्या आणि मग बघा त्या पदाला कसा न्याय देतो या शब्दांत त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version