मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत अनेक घरांवर दरड कोसळली. त्यामध्ये काहीजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, बॅनर आणि जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
काल रात्री इर्शाळवाडीत दरड कोसळून जवळपास दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. यातील जवळपास ८० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. जोरदार पाऊस आणि निसरडी वाट यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून या दुर्घटनेचा आढावा घेतला.
या घटनेबद्दल अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस राज्यभरात साजरा केला जातो. राज्यभरातील कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा करत असतात. परंतु इर्शाळवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पुष्पगुच्छ, बॅनर आणि जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज सकाळी रायगडमधील या घटनेचा अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून आढावा घेतला. संबंधित भागातील अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत त्यांनी मदतकार्याबद्दल सूचना केल्या. जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार असून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत दिली जाणार असल्याही माहितीही अजित पवार यांनी दिली. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी लक्ष ठेऊन असून राज्यकर्ते म्हणून आम्हीही सतत याबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.