आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मनोमिलन..? सुनील तटकरे-जयंत पाटील यांची विधानभवनात गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आपल्या समर्थक आमदारांसह पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात विधानभवन परिसरात गळाभेट झाली. एवढ्यावरच ही भेट संपली नाही, तर बराच काळ या दोघांमध्ये चर्चाही रंगली. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादीत मनोमिलन झाले आहे का अशीच चर्चा रंगू लागली आहे.

२ जुलै रोजी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी ५ जुलै रोजी आयोजित केलेल्या मेळाव्यात अजित पवार यांच्यासह समर्थक नेत्यांनी राष्ट्रवादीतील नेतृत्वावर जोरदार आरोप केले. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडूनही अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली. अशातच अजित पवार यांनी पक्षाची सूत्रे आपल्याकडे असून सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतील असे जाहीर केले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आज जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यात विधानभवन परिसरात भेट झाली. दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेत बराच वेळ चर्चा केली. त्यामुळे एकाच पक्षातील दोन प्रदेशाध्यक्षांच्या या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दुसरीकडे, सत्तेतील सहभागानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक मंत्री-आमदारांसह सलग तीनवेळा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीलाही अजित पवार यांनी हजेरी लावली. तर शरद पवार हे विरोधकांच्या बंगळुरू येथील बैठकीत सहभागी झाले होते. अशातच आज सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यातील गळाभेट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीत मनोमिलन होणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us