नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मिळावा यासाठी नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तेच्या गैरव्यवहारप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे ईडीने नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक केली होती. त्यानंतर मलिक यांनी मुंबई सुरुवातीला विशेष न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आल्यामुळे मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु उच्च न्यायालयानेही जामीनाला नकार दिला.
या दरम्यान, मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची एक किडनी निकामी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू असून किडनी प्रत्यारोपणासाठी त्यांना अन्य रुग्णालयात दाखल करायचे असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.