
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना रात्री उशीरा ईडीने अटक केली आहे. त्यानंतर आज दुपारी वैद्यकीय चाचणीनंतर संजय राऊत यांना ईडी न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीकडून संजय राऊत यांच्या चौकशीसाठी ८ दिवसांची कोठडी मागण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत म्हणजेच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १६ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आज सकाळी संजय राऊत यांना ईडी कार्यालयातून जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर ईडी न्यायालयात राऊत यांना हजर करण्यात आले.
ईडी न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यामध्ये संजय राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी बाजू मांडली. ईडीकडून न्यायालयात संजय राऊत यांच्या चौकशीसाठी आठ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
दरम्यान, ईडीने संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांच्याकडून मनी लॉन्डरींग केल्याचे साक्षीदारांकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला. तसेच राऊत यांच्याकडून साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार झाले असून त्यांना अटक केली नसती तर साक्षीदारांना धोका होता असेही ईडीकडून सांगण्यात आले. हा संपूर्ण १ हजार कोटींचा घोटाळा असून त्यांच्या चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली.
तर अशोक मुंदरगी यांनी ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी ईडी कोठडी देताना ती आठ दिवसांची न देता कमीत कमी असावी अशीही मागणी त्यांनी केली होती. तसेच चौकशीदरम्यान वकिलांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्याची मागणी करण्यात आली होती.