Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; अधिवेशनापूर्वी होणार मंत्रीमंडळ विस्तार..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. या पार्श्वभूमीवर आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार असून ९ किंवा १० जुलैला नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात मागील आठवड्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनाही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तत्पूर्वी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या बातम्या आल्या. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडला. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना कधी संधी मिळणार असंही प्रश्न पडला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी अखेर मुहूर्त मिळाला असून ९ किंवा १० जुलैला अर्थातच पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यात भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रीपदाची संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा शपथविधी कधी होतो याकडेच इच्छुक आमदारांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान पावसाळी अधिवेशन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. तब्बल १५ दिवस हे अधिवेशन चालणार आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात सत्ताधारी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही सहभाग लक्षवेधी ठरणार आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version