मुंबई : प्रतिनिधी
मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसैनिक मुख्यमंत्री होत असतील तर आपल्याला आनंद आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यातच आता सध्या शिवसेनेत निर्माण झालेलं बंड शांत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद द्यावं असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला कोणत्याही पदाची आस नसल्याचे सांगितले. त्याचवेळी तुम्ही चर्चेसाठी समोर या, मी तुमच्यासाठी मुख्यमंत्रीपदासह पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले आहेत.
शिवसेनेत राजकीय पेच निर्माण झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी या बंडावर तोडगा काढायचा असेल आणि महाविकास आघाडी सरकार स्थिर ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावं असा सल्ला दिला असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास हे बंड शांत होऊ शकेल अशी शाश्वतीही त्यांनी दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.