
मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद अखेर शिवसेनेकडे अर्थात ठाकरे गटाला मिळाले आहे. विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या अंबादास दानवे यांच्या नावाला विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मान्यता दिली. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदी दानवे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाले. त्यानंतर आता शिवसेना आणि शिंदे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. अशा परिस्थितीत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा सांगितला होता. त्याबद्दलचे पत्रही विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. त्यानुसार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दानवे यांच्या नियुक्तीमुळे शिवसेनेला विधानपरिषदेतील पक्ष मान्यता मिळाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे न्यायालयात वाद प्रलंबित असताना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने शिवसेनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विधानपरिषदेत शिवसेनेचे १२, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी १० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे.