
औरंगाबाद : प्रतिनिधी
औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारालाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सध्याच्या राजकीय संघर्षात पक्ष उभारणी करण्यासाठी या वयात आपण सक्षम आहात का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर तुमची तब्येत बरीय का..? माझं वय काढता..? खेळता का कुस्ती असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
शरद पवार हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते बीडमध्ये होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी १९८५ साली आपल्या ४९ आमदारांनी साथ सोडली होती. केवळ पाच आमदार माझ्यासोबत राहिले होते. नंतरच्या निवडणुकीत माझे ६८ आमदार निवडून आल्याचं सांगितलं. त्यावर आताच्या राजकीय संघर्षामध्ये आपले वय पाहता आपण सक्षम आहात का असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला.
यावर बोलताना शरद पवार यांनी तुमची तब्येत बरीय का..? माझं वय काढता..? असा प्रतिप्रश्न केला. त्याचवेळी खेळता का कुस्तीही असंही विचारलं. शरद पवार यांच्या या खुमासदार उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे बोलताना शरद पवार यांनी माझा जनतेवर, तरुण पिढीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा असल्याचं सांगितलं.
यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आपण भाजपसोबत जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. इंडियाची मुंबईत होणारी बैठक आम्ही सगळेजण यशस्वी करू आणि २०२४ मध्ये एकदिलाने लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.