
नाशिक : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी, तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काकी प्रतिभाताई पवार यांच्या हाताला इजा झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांच्यासमवेत तात्काळ ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन प्रतिभाकाकींची भेट घेऊन विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमात चर्चा रंगू लागल्या असताना अजित पवार यांनी या भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली आहे.
काल अजित पवार हे सकाळीच मंत्रालयात दाखल झाले. त्यांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. दुपारीच प्रतिभाकाकींच्या हाताला इजा झाल्याचे वृत्त समोर आले होते. एकूणच मागील काही दिवसातील राजकीय घडामोडीनंतर पवार कुटुंबात फुट पडल्याचे सांगण्यात येत होते. अशात प्रतिभाकाकींच्या भेटीसाठी अजितदादा आपले पुत्र पार्थ पवार यांच्यासह रात्री सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे चर्चांना अक्षरश: उधाण आले होते.
याबाबत आज नाशिकमध्ये पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर अजितदादांनी या भेटीबद्दल माहिती दिली. काल दुपारीच प्रतिभाकाकींच्या हाताला इजा झाल्याचे समजले होते. परंतु खातेवाटप आणि अन्य कामांमुळे रुग्णालयात जाता आलं नाही. त्यामुळे मी सुप्रियाला फोन केला. तिने काकींना घरी नेत असल्याचे सांगत कामातून निवांत झाल्यानंतर तू सिल्व्हर ओकलाच ये असा निरोप दिला. त्यानुसार रात्री मी सिल्व्हर ओकला गेलो. त्या ठिकाणी काकींची भेट घेत विचारपूस केली. त्यांना आता काही दिवस आराम करावा लागणार आहे असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी काही चर्चा झाली का याबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले, साहेब स्वत: घरीच होते. आमची राजकीय विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही. काल-परवा साहेबांनी मुख्यमंत्र्यांसह माझ्याकडेही एक पत्र पाठवले आहे. त्याबद्दल मी कालच संबंधित विभागाला माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याबद्दल साहेबांशी चर्चा झाली. साहेबांनी शिक्षणाच्या दर्जाबद्दल जो विषय मांडला आहे, त्याची माहिती घेऊन सुधारणेबाबत संबंधित विभागाला सूचना देणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, काल प्रतिभाकाकींच्या शस्त्रक्रियेनंतर अजितदादांनी तात्काळ सिल्व्हर ओकवर घेतलेली धाव चर्चेचा विषय ठरली. राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं ही आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे यात वेगळं काहीच नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीत फुट पडलेली असताना अजित पवार यांनी कालच्या कृतीतून कौटुंबिक ऋणानुबंध कायम ठेवण्याचे संकेत या निमित्तानं दिले आहेत.