बारामती : प्रतिनिधी
आजवर बारामतीत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. या कामांची पावती म्हणून येत्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. या लोकसभेला तुम्हाला भावनिक आवाहन केलं जाईल, मात्र समोर अजित पवारच उमेदवार आहे असं समजून मतदान करा आणि आपल्या बारामतीतील विकास अखंडीतपणे साधण्यासाठी साथ द्या असं सांगत अजितदादांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे.
बारामती शहरातील देसाई इस्टेट येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आज पार पडला. यावेळी बोलताना अजितदादांनी लोकसभेचा उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती दिली. तसेच आगामी काळात आपल्या बारामतीच्या विकासाची प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी अजित पवारच उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं.
येत्या लोकसभा निवडणुकीत ही शेवटचीच निवडणूक असं म्हणून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. मात्र तुम्ही भावनिक होऊ नका. आपल्या बारामतीत आज अनेक कामे सुरू आहेत. ही विकासाची प्रक्रिया निरंतर ठेवण्यासाठी मी दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन ना. अजित पवार यांनी केलं. मी आजवर केलेल्या कामाची पावती म्हणून लोकसभेला माझ्या उमेदवाराला साथ द्या असं सांगत ना. अजित पवार यांनी लवकरच उमेदवार कोण असेल याची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले.
ह्याला म्हणतात बारामतीकर
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करताना एका कार्यकर्त्याने वहिनीसाहेबांची उमेदवारी जाहीर करा असा आग्रह केला. एवढ्यावरच न थांबता दादा, तुम्ही आताच सगळ्यांसमोर उमेदवार जाहीर करा अशी विनंती केली. त्यावर ह्याला म्हणतात बारामतीकर असं म्हणत अजितदादांनी या कार्यकर्त्याला दाद दिली.