ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील व्हिवियाना मॉलमधील चित्रपटगृहात झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांना जामीन देण्यात आला. आव्हाड यांच्यासह अन्य १२ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यासाठी गेल्यानंतर व्हिवियाना मॉलमधील चित्रपटगृहात मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अचानक बोलावून घेत अटक केली होती. या अटकेनंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
आज जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर होताच आव्हाड यांच्या समर्थकांनी वर्तकनगर पोलिस ठाण्याबाहेर जल्लोष केला.