
मुंबई : प्रतिनिधी
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपामुळे ऑर्थर रोड कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ईडीच्या कारवाईनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. सध्या ते मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात आहेत. आज सकाळी कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वीही अनिल देशमुख यांना प्रकृतीचा त्रास जाणवला होता. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना अचानक चक्कर आल्यामुळे जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती व्यवस्थित होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.