नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव निश्चित करत मशाल हे चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले असून उद्या सकाळी १० वाजेपर्यंत तीन चिन्हांचे पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने शनिवारी शिवसेनेच्या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवत नवीन नावे आणि चिन्हांचे पर्याय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्याकडून मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूल ही तीन चिन्हे देण्यात आली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आले आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव देण्यात आले आहे. तर चिन्हासाठी तीन पर्याय देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावाबाबत मागणी केलेली. त्यावर अखेर निर्णय झालेला असून यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळसाहेबांची शिवसेना असे दोन गट असणार आहेत.