
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रात्री उशीरा ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. तर सुरतमध्ये शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र पाठक यांची अद्यापही एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे यांनी काही प्रस्ताव समोर ठेवल्याची माहिती मिळत आहे.
काल विधानपरिषदेच्या निकालानंतर नॉट रीचेबल झालेले मंत्री एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह सुरतमध्ये असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी ७ वाजता आमदारांची बैठक आयोजित केली आहे. तत्पूर्वी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली असून त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य काही मंत्री व नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
दरम्यान, दिल्लीत राष्ट्रपती पदाच्या संदर्भातील बैठका उरकून शरद पवार हे मुंबईकडे निघाले आहेत. रात्री ८ वाजता ते मुंबईत पोहोचणार असून त्यानंतर ते वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. एकूणच एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपूढे पेच निर्माण झाला असून आता त्यावर काय तोडगा निघतो याकडेच लक्ष लागलं आहे.