मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते माझं ऐकतील ही माझी खात्री असून लवकरच ते आपल्यासोबत असतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या खासदार-आमदारांच्या बैठकीत व्यक्त केल्याचे समजते. भाजपसोबत असताना काय त्रास झाला हे आपण पाहिलं आहे. आता राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस आपल्यासोबत आहेत. त्यामुळे कुठेही घाबरायचं कारण नसल्याचं त्यांनी आश्वस्त केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. हिंदुत्व हा मुद्दा लक्षात घेऊन कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असा त्यांचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांची बैठक घेतली.
एकनाथ शिंदे हे माझं ऐकतील. त्यांची समजूत काढण्याचे आपले प्रयत्न सुरू असून त्यातून सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी आपण भाजपसोबत होतो. त्यावेळी आपल्याला काही कमी त्रास झाला का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्यासोबत आहेत, ही महाविकास आघाडी कायम असणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.