पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ३२ वर्षांपासून अजितदादा जिल्हा बँकेचं प्रतिनिधीत्व करत होते. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात अजितदादांनी याच बँकेच्या माध्यमातून एंट्री केली. त्यामुळे त्यांनी अचानकपणे राजीनामा का दिला याबद्दल चर्चा होत आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्रीपद आणि इतर व्यापांमुळे अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे १९९१ पासून जिल्हा बँकेचे प्रतिनिधीत्व करत होते. जिल्हा बँकेची प्रगती साधण्यात अजित पवार यांचा मोलाचा वाटा आहे. आज अचानकपणे त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पुणे जिल्हा बँकेचे सर्वेसर्वा म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी बँकेला त्यांचे कायम मार्गदर्शन घेणार असल्याचेही दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अजितदादांच्या राजीनाम्यानंतर विविध चर्चा होत असतानाच उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाची वाढती जबाबदारी यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.