Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या बारामती दौऱ्यावर; कन्हेरीतून होणार दौऱ्याची सुरुवात

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या मंगळवार दि. ६ सप्टेंबर रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे हे बारामतीत येत आहेत. या दौऱ्याबाबत आढावा घेऊन ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात त्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती लोकसभा क्षेत्राचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवारी सपूर्ण एक दिवस ते बारामती लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रम व बैठकांमधून संवाद साधणार आहेत.

सोमवारी रात्री ११.३० वाजता चंद्रशेखर बावनकुळे हे बारामतीत येतील. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता कन्हेरी मंदिरातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रॅलीमध्ये बावनकुळे सहभागी होतील.

सकाळी ११ वाजता कसबा येथील युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर ते भाजप कार्यालयास भेट देतील. दुपारी १२.३० वाजता भिगवण रस्त्यावरील मुक्ताई लॉन्स येथे भाजपा जिल्हा बैठक होणार आहे. दुपारी २.३० वाजता मुक्ताई लॉन्स येथे लोकसभा कोअर टीमची व दुपारी ३ ३० वाजता सोशल मीडिया सेलची बैठक होईल. सायंकाळी ५.३० वाजता माळेगाव येथे बुथ बैठक झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता मोरगाव येथील मयूरेश्वर मंदिरात दर्शन घेतील. सायंकाळी ७ वाजता पुणे येथून सोरतापवाडी येथील गणेश फेस्टीवलला भेट देणार आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version