
मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर २-३ दिवसांत विचार करून निर्णय घेऊ अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाच्या अध्यक्ष निवडीबाबत ५ मे रोजी बैठक घेण्याच्या सूचना स्वत: शरद पवार यांनी दिल्या आहेत. तसेच या बैठकीत जो निर्णय होईल तो आपल्याला मान्य असेल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांनी आज नेहमीप्रमाणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या दरम्यान, प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र स्वत: शरद पवार यांनी निवड समितीची बैठक ६ मे ऐवजी ५ मे रोजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत होणारा निर्णय आपल्याला मान्य असेल असं सांगतानाच त्यांनी पक्षातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना या निर्णयाबाबत विश्वासात घ्यायला हवं होतं अशी खंत व्यक्त केली आहे.
मी कार्यकर्ते आणि प्रमुखांना याबाबत विचारलं असतं तर या निर्णयाला विरोध झाला असता. त्यामुळे मनाशी एकमत करून हा निर्णय घेतल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक युवक कॉँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याबद्दल सूचित केलं होतं. युवकांची मते विचारात घेऊन कार्यरत राहणं ही आपली सवय आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मतांचा आपण आदर करतो. येणाऱ्या काळात पक्षात ग्रामीण भागातील युवक युवतींना सक्रिय करण्याचा मानस असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.