आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG BREAKING : अजितदादांनी पहिल्याच झटक्यात फिरवली सूत्रे; प्रदेशाध्यक्ष बदलले, ‘या’ नेत्यांच्या अपात्रतेची मागणीही केली..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पक्ष संघटनेतही मोठे फेरबदल केले आहेत. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी सूरज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अपात्रतेच्या कारवाईबाबत विधानसभा अध्यक्षांकडे मागणीही केली आहे.

अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. अशातच आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात अजितदादांसह राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, मंत्री धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत पक्ष संघटनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती देण्यात आली.

जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर निवडणुका न होता जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना या पदावरून मुक्त केल्याचे अधिकृतरीत्या कळवण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी पक्षातील इतर संघटनात्मक बदलांचीही यावेळी माहिती देण्यात आली.

जयंत पाटील यांनी काल उशीरा पत्रकार परिषद घेत शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांच्या अपात्रतेबाबत पत्र दिल्याची माहिती दिली होती. त्यावर उत्तर देताना विधीमंडळ नेता या नात्याने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत कालच आपण विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकीकडे संघटनेतील पदांमध्ये बदल तर दुसरीकडे अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्षांकडे पत्र देत अजितदादांनी पहिल्याच झटक्यात गेम फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us