आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

Big Breaking : विरोधी पक्षनेतेपदासाठी अजितदादांच्या नावाची चर्चा; आमदारांचाही आग्रह

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते कुणाला मिळणार याबाबत चर्चा रंगत आहेत. काल रात्री झालेल्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत आग्रह केला आहे.

राज्यात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेत बंड झाले. तब्बल ३९ आमदारांनी सेनेपासून फारकत घेतली. त्यामुळे राज्यातले महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. या बंडावर तोडगा काढण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र त्यात यश येत नसल्याने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात आली आहे. आज या सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. तत्पूर्वी नवीन विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आज या मुद्यावरुन चांगलाच संघर्ष होणार आहे.

या सर्व घडामोडी सुरु असतानाच काल रात्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात असून आमदारांनीही यासाठी आग्रह धरला आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us