मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांना हटवावं अशी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची भावना झाली आहे. कारण कोश्यारी हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे काम करत आहेत, असा घणाघात त्यांनी केला आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मंत्रिमंडळाच्या काही प्रमुख सदस्यांनी त्यांची भेट घेतली. विधीमंडळाचे स्वातंत्र्य आणि राज्यातल्या सरकारचं त्यांनी महत्त्व विचारात घेऊन तारीख द्यायला हवी. मात्र त्यावर कोणताच निर्णय घेतला नसल्याने राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवलं पाहिजे ही केवळ सरकारची नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे. कारण ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे काम करत असून राज्यातील घटनात्मक पदावरील व्यक्तीला ते शोभत नाही.
राज्यात माझा आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केला जातो होता. निवडणुकीनंतर माझं काय चालू आहे यासाठी त्यांनी माझा फोन टॅप केला होता. हे सगळं रश्मी शुक्ला यांनी केलं असून त्यांनी ही माहिती कोणाला दिली याबाबतची कल्पना सगळ्यांना आहे. त्याचबरोबर गोव्यात सुदिन ढवळीकर यांचा फोन टॅप केला जात आहे, याबाबत मी स्वतः त्यांना माहिती दिली. फोन टॅप करणे हा महाराष्ट्राचा पॅटर्न असून महाराष्ट्र पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.