
बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने बारामती, इंदापूरमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली असून या दोन्ही तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. यामध्ये बारामती तालुकाध्यक्षपदी अॅड. एस. एन. जगताप यांची, तर इंदापूर तालुकाध्यक्षपदी अॅड. तेजसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
अजितदादांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली असून जवळपास ४२ आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. अशातच न्यायालय आणि निवडणूक आयोगातही सुनावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून बारामती आणि इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
बुधवारी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी बारामती तालुकाध्यक्षपदी अॅड. एस. एन. जगताप यांची आणि इंदापूर तालुकाध्यक्षपदी अॅड. तेजसिंह पाटील यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, या निवडीवेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर बारामतीतील काही कार्यकर्तेही उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, लवकरच शरद पवार गटाकडून पदाधिकारी निवडी केल्या जातील असे संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार आता बारामती आणि इंदापूर तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांना शरद पवार गटाकडून संधी देण्यात आली आहे. आता या सर्व घडामोडीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.