आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BARAMATI POLITICS : साहेब, दादा, ताई येणार एकाच व्यासपीठावर..! रविवारी स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नवीन इमारतीचं उदघाटन

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेनं दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नविन इमारतीचं उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाला हे तीनही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेनेला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. या दरम्यानच्या काळात अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर समर्थक आमदारांसमवेतही ते शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. दुसरीकडे पुण्यातही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणुक आयोगासह सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांकडून दाद मागण्यात आली. त्यामुळं दोन्ही गटात दरी वाढल्याची चर्चा होती. अशातच बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार किंवा सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांचं नाव पुढे आलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा झडत होत्या.

या सर्व परिस्थितीत आता स्वामी चिंचोलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वडील स्व. अनंतराव पवार यांच्या नावानं उभारलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नविन इमारतीचं उदघाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमात हे नेते काय बोलतात याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us