मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे मेळावा घेत जहाल हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे आणला. राज ठाकरे यांनी मशिदीवरील असणाऱ्या भोंग्याला विरोध करत भोंगे खाली उतरण्याचा इशारा दिला. अन्यथा आम्ही देखील मशिदीसमोर डबल लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दादर-माहीम-प्रभादेवी मतदारसंघात मनसेकडून लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरत आहेत.
मनसेने बॅनर लावत दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत जाहीर टीका केली. बॅनरमध्ये म्हटले आहे की, माननीय बाळासाहेब, बघा आपले पुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू आहेत. मात्र तरीदेखील हनुमान चालीसा म्हणण्यासाठी बंदी घालत आहेत. हिंदूंकडून लावण्यात आलेले भोंगे काढत आहेत. तुमचा ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने राज ठाकरे पुढे चालवत आहेत. जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या अशी जाहीर टीका मनसेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या जहाल हिंदुत्वाच्या भूमिकेवर त्यांच्या पक्षात कुरघोडी दिसत आहे. अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षातील अनेक पदाधिकारी आपले राजीनामे देत आहेत. पुण्यातील मनसेचे महत्त्वाचे नेते शहराध्यक्ष वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आपल्याला अडचण निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.