मुंबई : प्रतिनिधी
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीने अटक केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. परंतु त्यांच्या जामीन अर्जावर ८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे.
अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात २ नोव्हेंबर २०२१ ला अटक केली होती. या प्रकरणी विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांनी ॲड. अनिकेत निकम आणि ॲड. इंद्रपाल सिंह यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. ईडीने आपल्यावर खोटी केस करून या प्रकरणात अडकवले आहे असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
आज देशमुख यांच्या जामीनाबाबत सुनावणी होणार होती. परंतु उच्च न्यायालयाने जामीन अर्जाची सुनावणीची तारीख पुढे ढकलल्याने त्यांना तूर्तास कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा न्यायालयीन कोठडीतच मुक्काम वाढला आहे. सध्या ते मुंबईतील आर्थर रोडवरील तुरुंगात आहेत.