मुंबई: प्रतिनिधी
शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीने उच्च न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुख यांचा हात आहे. तेच गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार आहेत, अशी माहिती ईडीने न्यायालयात दिली.
अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी ईडीकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी आणि त्यांच्या नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांनी आपला प्रभाव वापरला. त्यामुळे या प्रकरणी तपास प्राथमिक टप्प्यावरच आहे. जर अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका केली, तर याप्रकरणी तपास करण्यात मोठा अडथळा निर्माण होईल. त्यामुळे उघडकीस न आलेले गुन्हे अस्पष्टच राहतील, असे न्यायालयात सांगण्यात आले.
अनिल देशमुख यांना ईडीकडून २ नोव्हेंबर रोजी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. ते सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यानंतर त्यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला असता, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर ईडीने न्यायालयात उत्तर दाखल केले आहे.