पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर येथील रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यावेळी आयोजकांनी त्यांच्या वयाचा उल्लेख केला असता मी ८२ वर्षांचा असलो तरी अजूनही म्हातारा झालेलो नाही, असं म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला.
या कार्यक्रमात बोलताना प्रारंभीच शरद पवार यांनी आयोजकांवर नाराजी व्यक्त करत मी अजुन म्हातारा झालो नाही असे मिश्कीलपणे सांगितले. कुस्तीगीर आणि माझा जुना संबंध असून मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. या आखाड्यात नवनवीन पैलवान तयार होत असून याचा मला आनंद आहे. मी खेळात कधीही राजकारण आणले नाही. राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
रविवारी शरद पवार पक्षाच्या मेळाव्यासाठी उस्मानाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळीही त्यांनी आपण म्हातारे झालो नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीला जे सोडून गेले त्यांची चिंता करण्याची गरज नाही. चार चार वेळा मला मुख्यमंत्री केले. ८२ वर्षांचा झालो म्हणजे म्हातारा झालो नाही. मी कधीच थकणार नाही, असेही पवार म्हणाले.