पुणे : प्रतिनिधी
जनतेला राजकिय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही, त्यांना विकास पाहिजे असल्याची प्रतिक्रिया आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पुण्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नोटिसा देण्याची पध्दत महाराष्ट्रात राज्यात अस्तित्वात नव्हतीच. तसेच वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या जात नव्हत्या. प्रत्येकाने आपापले काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, असं आपलं मत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीची वागणूक कशी असावी, सर्वांना सोबत घेऊन एकोप्याने कसे काम करावे हे दाखवून दिले असल्याचेही अजित पवार यांनी नमूद केले.
लोकांना कोण काय आरोप करतो आणि कोण काय उत्तर देतो याच्याशी अजिबात देणंघेणं नाही. लोकांना विकास हवा आहे. त्यांच्या अडीअडचणी सुटाव्यात ही माफक अपेक्षा जनतेची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. दरवेळी कोणीतरी वक्तव्य करतो. मग माध्यमे ही मत सगळ्यांपुढे दाखवतात. सगळा वेळ आरोप प्रत्यारोपात जातो. जनतेला राजकिय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून हे सगळे बंद करून विकासाला महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.